पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी कनेक्शन, नागपूरसह विदर्भात ATSची मोठी कारवाई; १० जण ताब्यात

Foto
नागपूर : पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने  आज पहाटे नागपूरसह विदर्भात एकाच वेळी मोठी कारवाई केली. सूत्रांच्या माहितीनुसार या मोहिमेत नागपूरमधून ४, चंद्रपूरमधून ३, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा येथून प्रत्येकी १ अशा एकूण १० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ATSने सर्व संशयितांचे मोबाईल फोन जप्त केले असून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स, व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम चॅट, कॉल डिटेल रेकॉर्ड तसेच इतर डिजिटल माहितीची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारचे निर्देश किंवा संपर्क प्रस्थापित करण्यात आले होते का आणि त्या संवादामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास यंत्रणा सखोल शोध घेत आहेत.

माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या काही व्यक्तींना शहजाद भट्टीच्या टोळीमार्फत काही महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्यास सांगितल्याचा संशय आहे. मात्र, याबाबत सविस्तर माहिती स्पष्ट झालेले नाही.

सध्या ताब्यात घेतलेल्या कोणत्याही संशयिताविरुद्ध अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ATSच्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्व बाबींची कसून चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची कळते.